Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

मालेगाव न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

या प्रकरणातील दोषी विजय खैरनार या नराधमाला मालेगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीला नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलने केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू केली. शासनाकडून ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात मांडली.

या खटल्यात पोलिसांनी अवघ्या २३ दिवसांत ४२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सुनावणीदरम्यान पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, पीडितेचे कुटुंबीय आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासह एकूण २४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष तसेच बालसाक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरल्याचे वृत्त आहे. सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आपली बाजू मांडली.

'दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो'

निखिल वागळेंनी सर्वोच्च न्यायालयापुढे नाक घासले

मक्कातील मशिदीच्या पावित्र्यभंगाचा आरोप; दोन बांगलादेशींना फाशी

हवेत उडी, गिरकी आणि लँडिंग! टेस्लाची 'रोडस्टर' चर्चेत

निकालाच्या वेळी आरोपी विजय खैरनार आणि त्याचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते. निकाल जाहीर झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी घटनेनंतर सातत्याने केली जात होती. दरम्यान, फाशीच्या शिक्षेविरोधात दोषीला उच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka