लांब पल्ल्याची हल्ला क्षमता आणखी मजबूत
भारतीय हवाई दलाने स्वदेशी लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब (LRGB) 'खगांतक-243' ची यशस्वी चाचणी केली आहे. या बॉम्बच्या समावेशामुळे भारताची स्वदेशी लांब पल्ल्याची हल्ला क्षमता आणखी मजबूत होणार आहे.
या बॉम्बमध्ये १२५ किलो वजनाचे एमके-८१ वॉरहेड बसवण्यात आले आहे. हा बॉम्ब १४४ ते १८० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर हल्ला करू शकतो. या क्षमतेमुळे लढाऊ विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या थेट कक्षेत न जाता दूरवरच्या लक्ष्यांवर हल्ला करता येणार आहे. त्यामुळे वैमानिक आणि लढाऊ विमानांची जोखीम कमी करत शत्रूच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता वाढणार आहे.
सुखोई-३० एमकेआयवर पहिली चाचणी
'खगांतक-243' ची पहिली चाचणी भारतीय हवाई दलाने पोखरण येथे सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून केली होती. हा स्वदेशी ग्लाइड बॉम्ब नागपूरस्थित स्टार्टअप जेएसआर डायनॅमिक्सने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत विकसित केला आहे. भारतीय हवाई दलाने पोखरण येथे सुखोई-३० एमकेआयवर या बॉम्बची चाचणी केली होती. भविष्यात मिग-२९के आणि मिराज-२००० या लढाऊ विमानांमध्येही 'खगांतक-243'चा समावेश करण्याची योजना आहे. या बॉम्बच्या निर्मितीसाठी भारतीय हवाई दलाने बीईएलला मर्यादित उत्पादनाची ऑर्डरही दिली आहे.
ग्लाइड बॉम्ब म्हणजे काय?
ग्लाइड बॉम्बमध्ये क्रूझ क्षेपणास्त्रांप्रमाणे स्वतंत्र इंजिन नसते. हे बॉम्ब विमानातून सोडल्यानंतर हवेच्या प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या उचल शक्तीचा वापर करून लक्ष्याच्या दिशेने सरकत जातात. इंजिन नसल्यामुळे ग्लाइड बॉम्ब तुलनेने कमी खर्चात तयार करता येतात. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होते. युद्धाच्या परिस्थितीत मोठ्या संख्येने अशा शस्त्रांचा वापर करण्यासाठी ही क्षमता महत्त्वाची ठरू शकते.
भारत-इराण जवळीकतेने अमेरिकेला मुरडा
कोलकात्यात तृणमूलचे कार्यालय फोडले
पाकिस्तानचे एफ-१६ पाडणारे अभिनंदन हवाई दलातून निवृत्त
'सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग'
'खगांतक' मालिकेत आणखी शक्तिशाली प्रकार
'खगांतक' मालिकेत ३०६ आणि २२५ यांसारखे अधिक वजनाचे प्रकारही समाविष्ट आहेत. या प्रकारांची मारक क्षमता तुलनेने अधिक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) २०२५ मध्ये १,००० किलो वजनाच्या 'गौरव' लाँग रेंज ग्लाइड बॉम्बचीही चाचणी केली होती. त्यामुळे भारत स्वदेशी लांब पल्ल्याच्या हवाई हल्ला क्षमतेच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असल्याचे दिसून येते.

