Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

NEWS डंका 3 weeks ago

अखिलेश यादवही गैरहजर

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावर तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावर म्हणजेच एसआयआरवर चर्चा करण्यासाठी इंडी आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत होत आहे.

मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच आघाडीतील काही प्रमुख पक्षांनी बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने मतभेद समोर आले आहेत. आम आदमी पक्ष (आप) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) ने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही बैठकीला उपस्थित राहणार नसून त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

डीएमकेने आपण सध्या इंडी आघाडीचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसने डीएमकेसोबतचे संबंध तोडून अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमला पाठिंबा दिल्याचा दावा डीएमकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नसल्याचे डीएमकेने म्हटले आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत विरोधकांच्या भूमिकेला पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

आम आदमी पक्षानेही बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीलाही आप आणि डीएमके उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे यावेळीही दोन्ही पक्षांची अनुपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. अखिलेश यादव बैठकीला उपस्थित राहणार नसले तरी समाजवादी पक्षाचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी अखिलेश यादव यांच्याशी तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेमुळे अखिलेश यादव व्यस्त असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडी आघाडीच्या बैठकीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेवर चर्चा होणार आहे. या प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यांच्या पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), डावे पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते बैठकीत सहभागी होत आहेत. मागील मोठी इंडी आघाडीची बैठक ८ जून रोजी झाली होती.

:

८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये

भारत-पाक सीमेजवळ महामार्गावर उतरले लष्कराचे हेलिकॉप्टर

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर 'शोले' स्टाईल हल्लाबोल

बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

या मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात संयुक्त आंदोलनाची दिशा ठरवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन मोठे आंदोलन उभारण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, बैठकीपूर्वीच आप आणि डीएमकेची अनुपस्थिती तसेच अखिलेश यादव यांची गैरहजेरी यामुळे या एकजुटीला कितपत व्यापक स्वरूप देता येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka