मुलींना घरी जायचे आहे, पण न्यायालयाला पाझर फुटेना
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका न्यायालयाने १३ आणि १४ वर्षांच्या दोन हिंदू बहिणींना त्यांच्या पालकांसोबत घरी पाठवण्यास नकार दिल्यानंतर त्या न्यायालयाबाहेर ढसाढसा रडताना दिसल्या.
पत्रकार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. या मुलींचे आधी अपहरण करून मग त्यांना धर्मांतरीत करण्यात आले आणि नंतर त्यांचा कुठल्यातरी पुरुषांशी निकाह लावण्यात आला.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, सीता आणि रूपी या कच्छी कोहली समाजातील मुलींचे अपहरण करण्यात आले, त्यांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे अमजद सोलंगी आणि मन्सूर सोलंगी यांच्यासोबत विवाह करण्यात आले. अमेरिकास्थित सिंधी हक्कांसाठी काम करणाऱ्या सिंध रेनेसाँन्स या संस्थेने ही माहिती दिली आहे.
सिंधमधील टांडो अल्लाहयार जिल्ह्यातील न्यायालयाने दोन्ही बहिणींना सुरक्षित निवासगृहात (सेफ हाऊस) हलवण्याचा आदेश दिला. मात्र, त्या रडत होत्या आणि वारंवार 'आम्हाला घरी जायचे आहे' अशी विनंती करत होत्या. पाकिस्तानी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या विंगास यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये या मुलींची अवस्था दिसून आली.
न्यायालयीन सुनावणीनंतर मुली रडल्या
टांडो अल्लाहयारमधील इब्राहिम कॉलनीतील या बहिणींना मागील आठवड्यात नोंदवण्यात आलेल्या अपहरणाच्या प्रकरणासंदर्भात न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, मुलींनी वारंवार त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवण्याची विनंती केली.
पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी या घटनेचे वर्णन करताना म्हटले की, न्यायालयाने त्यांना त्यांच्या पालकांसोबत पाठवण्यास नकार दिल्यानंतर त्या मुली रडताना पाहणे अत्यंत हृदयद्रावक होते.
यानंतर दुसऱ्या दिवशी विंगास यांनी माहिती दिली की, 'पांसी कोहली नावाच्या आणखी एका १४ वर्षीय हिंदू मुलीचे ९ सप्टेंबर रोजी टांडो अल्लाहयार येथून अपहरण करण्यात आले.' त्यांनी उपलब्ध वृत्तांचा हवाला देत सांगितले की, या जिल्ह्यात केवळ १० दिवसांच्या कालावधीत सहा हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवरील वागणुकीबरोबरच टांडो अल्लाहयार जिल्ह्यावरही लक्ष केंद्रित झाले आहे. या जिल्ह्यात यापूर्वीही हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि धर्मांतराशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आल्याचे सांगितले जाते.
सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!
मल्ल्याच्या १५ हजार कोटींच्या वसुलीने प्रकरण संपणार नाही!
'भारताविरोधात श्रीलंकेच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही'
चीनमध्ये मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू
सिंधमध्ये हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर, निकाह
पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्येचा मोठा हिस्सा सिंध प्रांतात राहतो. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात येते आणि त्यानंतर मुस्लिम पुरुषांशी त्यांचे विवाह लावले जातात, अशा तक्रारींचे केंद्रस्थान सिंध प्रांत बनले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
विशेषतः कोहली, भील आणि मेघवार या सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांतील गरीब कुटुंबे अधिक असुरक्षित असल्याचे सांगितले जाते.
यामागे त्यांचा पोलिसांपर्यंत मर्यादित प्रवेश, न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत मर्यादित पोहोच, कायदेशीर मदतीचा अभाव, प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्या राजकीय हक्कांवरील मर्यादा ही कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अम्नेस्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील शेकडो तरुण हिंदू महिलांना अपहरण, जबरदस्तीचे धर्मांतर आणि जबरदस्तीच्या निकाहला सामोरे जावे लागले आहे. मानवाधिकार संघटनेने पाकिस्तानातील हिंदूंविरुद्ध सुरू असलेल्या भेदभावाबाबतही इशारा दिला आहे. यात हिंदू मंदिरांवर आणि व्यवसायांवर होणारे हल्ले तसेच ईशनिंदा कायद्याच्या आरोपांचा गैरवापर यांचा समावेश आहे.

