प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच छायाचित्रांवर आक्षेप
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा आणि छायाचित्रकार रेहान वाड्रा याच्या दिल्लीतील प्रदर्शनातून आंदोलनांची छायाचित्रे हटवण्यास सांगितल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला आहे.
दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे आयोजित 'नो आयडिया इज फायनल' या प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच प्रशासनाने छायाचित्रांवर आक्षेप घेतल्याचा दावा रेहान याने केला. त्याच्या आरोपांना आई प्रियांका गांधी, वडील रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसच्या खासदारांनी समर्थन दिले आहे.
रेहान याच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनातील १०५ छायाचित्रांपैकी ७४ छायाचित्रे हटवण्यास किंवा बदलण्यास सांगण्यात आले. यामध्ये दिल्लीतील विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या तसेच भारतीय तिरंग्याशी संबंधित छायाचित्रांचा समावेश होता.
रेहान याने १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचा आराखडा प्रशासनाला सादर केला होता आणि त्याची पोचपावतीही मिळाली होती. मात्र, २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी, काही छायाचित्रांमुळे प्रदर्शनस्थळाच्या आरक्षण धोरणाचे उल्लंघन होऊ शकते, असे त्याला सांगण्यात आले. यावर रेहान याने आक्षेपाची कारणे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर मिळाले नसल्याने छायाचित्रे हटवण्यास सांगण्यात आल्याचा त्याचा दावा आहे.
सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले
'परदेशी नेत्यांची वक्तव्ये मूर्खपणाची, अस्वीकार्य'
वाशीममध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून राडा
घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
भारत आणि दिल्लीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे राजकीय स्वरूपाची ठरत असल्याचे प्रशासनाने सांगितल्याचे रेहान याने नमूद केले. मात्र, कलाकृतीचा राजकीय संदर्भ पाहून तिच्या प्रदर्शनावर निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत त्याने व्यक्त केले. दुपारी साडेतीनच्या सुमारास सायंकाळी ४ वाजेपर्यंत छायाचित्रे न हटवल्यास प्रदर्शन रद्द करून इमारत सील करण्याचा इशारा देण्यात आल्याचाही आरोप त्याने केला. सुरुवातीला रेहानच्या टीमने छायाचित्रांच्या फ्रेम फिरवून ठेवल्या; मात्र, अधिकाऱ्यांनी ती पूर्णपणे काढून संग्रहालयात ठेवण्याचा आग्रह धरल्याचे त्याने सांगितले.

