राजस्थानच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सची कारवाई
अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने (एटीएफ) राजस्थान पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत असताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. फूल सिंग, रेहान आणि हृतिक कुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एटीएफ राजस्थानने या कारवाईला दुजोरा दिला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हृतिक कुमार उर्फ रोशन (वय २२), रेहान (वय १८) आणि फूल सिंग (वय १७) यांचा समावेश आहे. हृतिक कुमार हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई येथील रहिवासी असून, सध्या तो मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात, उर्दू शाळेजवळील गिल बारली येथे राहतो. तो रॅपिडो चालक म्हणून काम करतो. रेहान हा हरियाणातील सोनीपत येथील ईदगाह कॉलनीचा रहिवासी असून, तो ऋषिउद्दीन अन्सारी यांचा मुलगा आहे. तर फूल सिंग हा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बडोदा, थुथान येथील रहिवासी आहे. मुंबईतील गोळीबाराच्या घटनेनंतर हे आरोपी फरार होते. त्यांचा शोध सुरू असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकावर कारवाई केली.
मुंबईतील जुहू परिसरात १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या गाडीच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.
'लष्कर' संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती
प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा
गोळीबारानंतर सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणारी पोस्ट समोर आली होती. या पोस्टमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. कोटा येथे तिघांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आरोपींची गोळीबारातील नेमकी भूमिका, हल्ल्याचे नियोजन आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

