बदलापूर : एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केले.
बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर उतरून आंदोलन करण्यात आले होते. यामुळे कल्याण ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली होती. एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल रोको, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
बदलापुरात इंटरनेट सेवा रात्रीपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बदलापूरात व्हायरल मेसेजमुळे पुन्हा आंदोलन भडकू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली. बदलापुरातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरातील जनजीवन सुरळीत सुरू आहे. बदलापूर स्थानकावरही कमी गर्दी आहे.
बदलापूरमधील नराधम आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली. अक्षय 1 ऑगस्ट रोजी या शाळेत कामाला लागला होता. 12 ऑगस्ट रोजी त्याने या मुलींसोबत हे गैरकृत्य केले होते. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
The post बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

