Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात ८० वर्षीय महिलेच्या खासगी मालमत्तेत अनधिकृत प्रवेशाचा आरोप.

पुणे शहरात ८० वर्षीय महिलेच्या खासगी मालमत्तेत अनधिकृत प्रवेशाचा आरोप.

सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रारधमकी, मानसिक छळ व व्यवसायात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप; संरक्षण देण्याची मागणी
पुणे : सोमवार पेठेतील दासवानी सहकारी गृह संस्था मर्यादितमधील चेअरमन व सेक्रेटरी यांनी आपल्या खासगी मालमत्तेत अनधिकृतपणे प्रवेश करून धमकावले, मानसिक छळ केला तसेच हॉटेलमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप ८० वर्षीय लिला संजीव शेट्टी यांनी केला आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि आपल्याला व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

लिला शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीने सन १९६७ पासून सोमवार पेठ येथे 'हॉटेल अशोक रेस्टॉरंट व बार' हा व्यवसाय सुरू केला. पतीचे सन २००५ मध्ये निधन झाल्यानंतर हॉटेल व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्या स्वतः सांभाळत आहेत. हॉटेलमध्ये तीन मॅनेजर असून, दैनंदिन कामकाज त्यांच्यामार्फत पाहिले जाते. सदर हॉटेल हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सूचनांनुसार हॉटेलच्या अंतर्गत भागात साफसफाई व आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, या कामाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचे चेअरमन सुधीर मारुती काळे आणि सेक्रेटरी रवि नारायण अय्यर व अन्य दोघांनी कर्मचाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप लिला शेट्टी यांनी केला आहे.

शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता हॉटेलचा दरवाजा बंद असतानाही चेअरमन यांनी कोणतीही परवानगी न घेता हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी मॅनेजर व कर्मचाऱ्यांना काम कोणी सांगितले आणि कोणाची परवानगी घेतली, अशी विचारणा करून धमकावले. तसेच पोलिसांना बोलावण्याची भाषा करून कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सेक्रेटरी यांनीही हॉटेलमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून छायाचित्रे काढली आणि कामाबाबत धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हॉटेलचे काम करणेही अशक्य झाले आहे. परिणामी आपले मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेट्टी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

'व्हॉट्सॲप ग्रुपवरूनही मानसिक दबाव'
सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्या व व्यवसायाबाबत त्रासदायक, अपमानास्पद आणि दबाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. 'तुम्हाला हॉटेल कशाला पाहिजे?' तसेच 'तुम्ही भरपूर पैसे कमावले आहेत,' अशा प्रकारची वक्तव्ये करून आपल्यावर मानसिक दबाव आणला जात असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. आपल्या मुली परदेशात राहत असल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याची भावना असून, हॉटेलची जागा व व्यवसायावर दबाव निर्माण करून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर संशय लिला शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

'माझ्या सुरक्षिततेची चिंता'
मी ८० वर्षांची वृद्ध महिला असून, संबंधित व्यक्तींच्या सततच्या त्रासामुळे मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे. रात्री-अपरात्री भीतीने जाग येते. स्वतःच्या मालमत्तेत आणि व्यवसायाच्या ठिकाणीही सुरक्षित वाटत नसल्याचे शेट्टी यांनी तक्रारीत म्हटले आहे. भविष्यात आपल्या जीवितास, सुरक्षिततेस किंवा मानसिक आरोग्यास कोणतीही हानी झाल्यास त्यास संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून खासगी मालमत्तेत अनधिकृत प्रवेश, धमकी, मानसिक छळ आणि व्यवसायात बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तसेच आपली व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेश, छायाचित्रे व अन्य डिजिटल पुराव्यांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला आयोग आणि प्रसारमाध्यमांकडेही पाठविण्यात आल्याचे तक्रारदार लिला शेट्टी यांनी नमूद केले आहे.

पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…

पुणे! कात्रज बोगद्याजवळ रक्तरंजित थरार; बापाच्या हत्येचा 24 वर्षांनी घेतला बदला…

पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…

पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा…

पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka