पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलात 'गन मॅन' म्हणून विशेष ओळख असलेले धडाकेबाज पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली खंडणीची तक्रार पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे मुंबई उच्च न्यायालय पाठोपाठ पुण्याच्या सत्र न्यायालयानेही मान्य केले आहे.
उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी दिलेला खटला रद्द करण्याचा आदेश आणि आज ८ जुलै २०२६ रोजी पुणे सत्र न्यायालयाने त्यावर केलेले अंतिम शिक्कामोर्तब, यामुळे शैलेश जगताप यांच्यावरील कलंक पूर्णपणे पुसला गेला आहे.
शैलेश जगताप यांना पोलिस दलात भरती होऊन ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या ऐन उभारीच्या काळात त्यांनी गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा दिला होता. मात्र, याच काळात पुण्याचा कथित गुन्हेगार राहुल सुरेश खेतरे याने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून जगताप यांच्याविरुद्ध खंडणीची खोटी तक्रार दाखल केली होती. या खोट्या गुन्ह्यामुळे जगताप यांना त्यांच्या आयुष्यातील तब्बल ५ वर्षे कारागृहात घालवावी लागली. शिवाय, काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी सातत्याने खोट्या तक्रारींचा ससेमिरा मागे लावल्यामुळे त्यांना थेट सेवामुक्त (बडतर्फ) करण्यात आले.
सध्या पोलिस दलात आणि जगताप यांच्या हितचिंतकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की, जगताप यांची वाढती लोकप्रियता आणि जरब पाहून काही लोकांनी "त्यांना कोणत्याही परिस्थितीत खात्यात परत येऊ द्यायचे नाही", असा चंगच बांधला होता. याच अंतर्गत राजकारणामुळे आणि षड्यंत्रामुळे एका कर्तव्यदक्ष हवालदाराचा बळी गेला, अशी उघड चर्चा आता अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.
हवालदार शैलेश जगताप यांचा पुणे शहरातील गुन्हेगारी जगतात आजही मोठा दबदबा आहे. सन २०१८ पर्यंतच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी २५० पेक्षा जास्त बेकायदेशीर अग्नीशस्त्रे (कट्टे व पिस्तूल) जप्त केली होती. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासनातर्फे त्यांना २२५ पेक्षा जास्त बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय, त्यांनी शहरात सुमारे ५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) पकडून मोठी कारवाई केली होती.
दरम्यान, उच्च आणि सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे शैलेश जगताप यांच्यावरील सर्व आरोप खोटे ठरले असून, पुणे शहर पोलिस दलाने अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे एक अत्यंत कार्यक्षम आणि शूर हवालदार गमावला असल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…
पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे पोलिसांचे बुधवार पेठेतील महिलांना दोन प्रश्न अन् झाली पोलखेल…
पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

