स्फोटकांचे जॅकेट घातलेल्या व्यक्तीला पकडल्याचा दावा
मक्कातील ग्रँड मशिदीत एका व्यक्तीने आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. स्फोटकांनी भरलेले जॅकेट परिधान केलेल्या एका व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे दावे करण्यात आले.
मात्र, सौदी अरेबियाच्या सुरक्षा यंत्रणांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
सौदी सार्वजनिक सुरक्षा यंत्रणेने सांगितले की, मक्कातील एका व्यक्तीला वाटसरूंना त्रास देणे आणि त्यांच्यामध्ये भीती व घबराट निर्माण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. संबंधित व्यक्तीवर त्याचवेळी कारवाई करण्यात आली असून, या घटनेबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे सुरक्षा यंत्रणेने स्पष्ट केले आहे. प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी सरकारी वकिलांकडे सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांमध्ये संबंधित व्यक्तीने काबाजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडे स्फोटकांनी भरलेले जॅकेट असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या दाव्यांना सौदी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मक्का आणि मदिना या दोन्ही शहरांबाबत सुरक्षा चिंता वाढल्या आहेत. यापूर्वी सौदी नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील हुती बंडखोरांवर मक्केकडे ड्रोन पाठवल्याचा आरोप केला होता. हुतींनी हा आरोप नाकारला होता.
फ्लाय दुबईचा 'तो' हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा
राहुल गांधींनी गौरवलेल्या 'मोहम्मद दीपक'ला धमकी प्रकरणी अटक
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार
फ्लायदुबई हल्ल्यात इराणचा संबंध असल्यास…
त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी मदिनेत पैगंबर मशिदीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वितरण केंद्रावर ड्रोन हल्ला झाल्याचा आरोप सौदी नेतृत्वाखालील आघाडीने केला. या हल्ल्यात एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले, मात्र वीजपुरवठ्यावर व्यापक परिणाम झाला नसल्याचे आघाडीने सांगितले. या हल्ल्यामागे हुतींचा सहभाग असल्याचे ड्रोनच्या अवशेषांच्या तपासातून निष्पन्न झाल्याचा दावा सौदी आघाडीने केला; हुतींनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. त्यामुळे मक्केतील ग्रँड मशिदीत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या दाव्याला सध्या अधिकृत पुष्टी नसून, सौदी सुरक्षा यंत्रणेने तो दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

