नाशिक: नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये आई, तिची आठ महिन्यांची गरोदर मुलगी आणि गर्भातील बाळाचा समावेश आहे.
घटनेच्या दिवशी तिघेही मुक्तीधाम मंदिर परिसरातून पायी चालत होते. यावेळी एका भरधाव ट्रकने दोघींना चिरडलं आहे.
मुक्तिधाम मंदिरासमोरील नेहमीच गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. बिटकोहून मालधक्का रोडकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने प्रथम एका कारला धडक दिली. त्यानंतर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना उडवत, रस्ता ओलांडणाऱ्या सुनीता भीमराव वाघमारे (वय ५०) आणि त्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद केदारे यांना चिरडले.
या भीषण अपघातात सुनीता वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शीतलला उपचारासाठी तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा आणि तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. शीतल ही बाळंतपणासाठी नुकतीच आपल्या माहेरी आली होती. पण जग बघायच्या आतच तिच्या बाळाचा आणि तिचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या निष्पाप जीवांच्या मृत्यूबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एका दुर्दैवी घटनेत अशाप्रकारे मायलेकीचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत.