पुणे: पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडं शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आरोपी पोलिस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. मेसचे डब्बे पोहोच करणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.
महिलेनं विरोध करताच आरोपी पोलिसाने आपला पवित्रा बदलला. आपण हॉटेलमध्ये छापा टाकायला आल्याचा बनाव त्याने केला. यावेळी संबंधित पोलिसाच्या पायात बूट आणइ अंगावर वर्दी नव्हती. त्याने जॅकेटच्या आतमध्ये वर्दी लपवली होती. यावरून पीडित महिलेने पोलिसाला जाब विचारला, तुम्ही छापा टाकायला आला आहात तर तुमचं पोलिस पथक कुठे आहे? असा सवाल विचारला. दारुच्या नशेत तुम्ही कशी छापेमारी करू शकता? असा सवालही महिलेने विचारला. यावर आरोपी पोलिसाला काहीच उत्तर देता आले नाही.

