मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर बाप-लेकाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. शिवाय, संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती.
'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!
हरिश मेहता आणि जय मेहता अशी आत्महत्या केलेल्या पितापुत्राची नावे आहेत. दोघे वसईतील वसंतनगरी परिसरात राहत होते. मंगळवारी त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हरिश आणि जय मेहता यांच्या घराची झडती घेतली. पोलिसांना घरात इंग्रजी भाषेत लिहलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत, असे लिहलेले आहे. त्यामुळे मेहता पितापुत्रांनी आत्महत्या केली की काही वेगळाच प्रकार आहे, या शक्यतेने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या मेहता बापलेकाच्या बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि मोबाईल रेकॉर्ड तपासले जात आहेत.
मेहता पितापुत्रांना शेअर बाजारात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाल्याची प्राथमिक माहिती होती. पण, पोलिसांनी नव्याने केलेल्या तपासात हरिश मेहता आणि जय मेहता यांनी कोणतेही कर्ज घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. मग मेहता पितापुत्रांनी नेमक्या कोणत्या दबावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

