अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
तसेच या प्रवासांसोबत विमानात 11 लहान मुले देखील होती. या भीषण अपघातात सर्वांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवाय, ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणच्या 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. टेक ऑफ केल्यानंतर आज (गुरुवार) दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान रहिवासी भागात कोसळले. विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलच्या मेसवर हे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर आगीचा आगडोंब उसळला होता. घटनास्थळावर मृतांचा खच्च पडला होता. शिवाय, या स्फोटात मेसमधील २५ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

